DIARIES DE AMK
डिसेंबरच्या शेवटी नळीची वाट करून झाली आणि वेध लागले होते ते AMK चे.
तब्बल 4 दिवसांच्या ट्रेकसाठी सुट्या मिळणे तसं अवघडच, पण बॉसला मस्का मारून-मारून शेवटी संक्रांतीच्या मुहूर्तावर सुट्टी मिळाली आणि AMK ची तयारी सुरु केली. कधी 22 तारीख येते याची आतुरता लागली होती. शेवटी ती रात्र उजाडली, ऐनवेळी अजिंक्यचं येणं रद्द झालं. रात्री नेहमीप्रमाणे जंगली महाराज रोडवरून 16 'सह्यवेडे' सह्याद्रीच्या मुकुटमण्याला गवसणी घालायला निघाले. सोबत वाटाड़या म्ह्णून कोकणकड्यावरच्या ’द ग्रेट भास्करदादा’चा भाऊ 'बजरंग' आणि त्याचा मित्र 'रोहिदास' येणार होता. त्यांना वाटेत घेऊन पहाटे 'अलंगच्या' पायथ्याला पोहचलो.
पहाटेचं गार वारं असल्यामुळे सगळे साखरझोपेतच होते. जरा सकाळ झाल्यावर बाहेर येऊन पाहतो तर काय? सूर्यनारायणराव आपल्या सोनसळी किरणांनी अलंगला अभिषेक करत होते. ते दृश्यच अद्भुत होतं.
 |
| अलंग चे पाहिले झालेले दर्शन |
सगळी आन्हिकं उरकून प्राचीने ( प्राची शिंदे) सगळ्यांना बोलवून सूचना दिल्या. कारण, सर्वात अनुभवी अशी तीच होती. तिचा तब्बल ४ वेळा AMK झालेला आहे हे ऐकून नवल वाटलं . सुरवातीला सगळ्यांचे ग्रुप पाडले होते. मी पंतांच्या गटात होतो. सोबतीला जयंत, धनःश्री आणि योगेश होता. हळूहळू अलंग चढायला सुरूवात केली. साधारण ११ वाजता अलंगच्या पठारावर विश्रांतीसाठी थांबलो. जयंत आणि मी आजूबाजूला भटकत असताना सहज पानाची सळसळ झाली म्हणून जरा निरखून पाहिलं, तर मण्यार ची जोडी दिसली. आम्ही आल्याने त्यांना बहुदा त्यांच्या कामात व्यतय आला असावा, कारण त्यातला नर फ़ुत्कारत आमच्याकडे चाल करून आला. त्यांना जास्त त्रास न देता, जमतील तेवढे फोटो काढून परतीला आलो. बाकीची टीम आराम करून एकदम तयार झाली होती. आता खर्या अर्थाने अलंगच्या चढाईची सुरूवात झाली.

बजरंग, रोहिदास, पंत, सागरदा रस्ता शोधत पुढे गेले होते. मागून मी, राहूल आणि प्राची सगळ्यांना पुढे पाठवत जंगलातून दिसणाऱ्या मदनच्या उंचीचा अंदाज लावत पाऊल टाकत होतो. थोड्याश्या जंगलवाटेतून गेल्यावर अलंगचा पहिला patch लागला. अलंगवर चढाई करायचा हा एकाच मार्ग. साधारणपणे २० फुटी खड्या कातळकड्यावर, एका फटीत बांबू अडकवून त्याच्या मदतीने वरती चढावं लागतं. दिसायला अत्यंत साधा दिसणारा हा patch, भल्या भल्यांना दत्त दाखवतो. सगळ्यांना सावलीत थांबायला सांगूनो सागरदा, राहुल, प्राची, पंत आणि बजरंग दोर घेऊन कड्याला भिडले. नावावाप्रमाणे असणारा बजरंग तो कातळकडा केवळ एका बांबूच्या मदतीने सरसर वर चढून गेला. रोप लावून झाला. आता एक-एक जण patch चढायला लागला. तेवढ्यात ’छोटू’चा नंबर आला आणि आराम करत असलेले सगळे उठून patch कडे बघायला लागले. त्याला कारण पण तसंच होतं. ’छोटू’ चा " भैरवगड" मोरोशीचा rapelling चा video फेसबुकवर भरपूर प्रसिद्ध झालेला होता, त्यामुळे ’छोटू’ हा patch climb कसा करते, याची सगळ्यांना उत्सुकता होती. अरे 'छोटु' कोण? म्हणून काय विचारताय- छोटू म्हणजे, आमची ’जुई सुर्यकांत राणे’ AKA ’छोटू’. मूर्ती जरी लहान असली, तरी तिच्या दिसण्यावर जाऊ नका बरं! तिचा पहिला ट्रेक होता भैरवगड मोरोशीचा; दुसरा हरीश्चंद्रगड (नळीच्या वाटेने) आणि तिसरा खुद्द AMK! तर, अशी आमची ही छोटू climbing ला सुरुवात करत होती. सगळेजण उत्सुकतेने पहायला लागले आणि बघता-बघता तिला सागरदा आणि प्राचीने वरती खेचून घेतलं. ती सहजपणे वरती गेली. हे पाहून बाकीच्यांनापण हुरूप आला. मग सर्व पटापट वरते चढायला लागले. एक-एक करता सगळे नंबर होत आले. AMK मध्ये दत्त दिसायची आता माझी पाळी होती. देवाचं नाव घेऊन कसंबसं वर चढलो आणि माझ्या जीवात जीव आला. patch झाल्यावर आता उत्सुकता होती, ती अलंगच्या Travers ची.
 |
| अलंगचा Travers |
ट्रेकच्या आधी विनायकच्या जुन्या AMK च्या फोटोत हा travers पहिला होता. तो आता प्रत्यक्ष चालणार होतो. जवळपास २. किमी चा मार्ग म्हणजे भन्नाट प्रकरण! एका बाजूला अजस्त्र असा अलंग आणि दुसर्या बाजूला खोल अशी दरी. आपला तोल आणि पाठीवरची sack सांभाळत हा रस्ता पार करणं म्हणजे दिव्य आहे. याला पार केला कि अलंगची गुहा येते. तेच आमचं आजचं मुक्कामाचं ठिकाण होत, गप्पा मारत हा travers कसा पार झाला ते कळलंसुद्धा नाही.किल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. गुहा कसल्या ५-६ खोल्यांचा महालच! यात साधारणपणे ३० ते ४० जण राहू शकतात.
 |
| अलंगची गुहा |
२६ तारखेला धरून आलेली लांब सुट्टी पाहून आधीच नियोजन केल्याने त्या भव्य अश्या महालात फक्त 'सह्यवेडे' होतो. गुहेजवळ पोहचताना संध्याकाळचे ५ वाजले होते. बाकीचे सह्यवेड्यांनी पटकन फ्रेश होऊन चहा बनवावा अस ठरवलं. कारण अजून किल्ला फिरायचा होता आणि सूर्यास्तपण व्हायला आला होता.
चहा घेऊन पटकन सगळे माथ्यावर गेलो. प्रचंड विस्तार असलेला या किल्ल्यावर आता पडक्या वाड्याचे अवशेष आणि ११ पाण्याच्या टाक्या उरल्या आहेत. त्यातील बहुतांश टाक्यांमधले पाणी पिण्यायोग्य होते. अस्ताला जाणार्या सूर्याला टाटा करून सगळे गुहेत परतलो.
एव्हाना सर्वांना भुकेची जाणीव होऊ लागली होती, त्यामुळे पट्कन व्हेज बिर्याणी करायला घेतली. सोबत आणलेल्या पापडावर ताव मारत बिर्याणी तयार होत होती त्याची वाट पाहात होतो. संपूर्ण गुहेत बिर्याणीचा घमघमाट सुटला होता, त्यामुळे सगळेच ताट-वाट्या घेऊन तयार होते...
क्रमश: