पुणे म्हणजे खवय्यांचा स्वर्गच आहे, आजही पुण्यात अश्या अनेक जागा आहेत ज्या खाद्यप्रेमी रसिकांच्या
जिभेची रसना तृप्त करतात.जसं जसं पुण्याचा विस्तार होत गेला तसा खाद्यसंस्कृतीचा सुद्धा विस्तार झाला. शहरातल्या प्रत्येक भागाची एक वेगळी ओळख निर्माण झाली. अगदी सोवळयात असलेल्या सदाशिव पेठेत सामिष भोजनासाठी प्रसिद्ध असलेले 'दुर्गा' , 'रस्सा ' सुरु झालं. 'अप्पाची' खिचड़ी काकडीने 'खिचड़ी' हां पदार्थ फक्त उपवासाचा न ठेवता रोजच्या खाण्यात आणला. 'रेशमाच्या' 'भुर्जी-पाव' ने कित्येक खादाडी करणारयांचा पोटोबा शांत केला.काल विस्ताराबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची हॉटेल्स पुण्यात वेगवेगळ्या भागात स्थानापन्न झाली, त्यामधे अनेक देशातले प्रकार मिळू लागले, पण साध्या 'अमृततुल्य' मधे मिळणाऱ्या चहाची बरोबरी अजुनही कोणी करू शकलं नाही.तर पुण्यातल्या अशाच माझ्या आवडत्या रेस्टॉरंटची सफर इथे करुया.
सुरवात माझ्या अत्यंत आवडत्या 'Cafe Good luck' पासून.पुण्यात स्वातंत्र्यपूर्व काळात बरेच इराणी हॉटेल्स सुरु झालीत. त्यांच्या वेगळेपणामुळे ती प्रसिद्ध ही झाली, 'GOOD LUCK CAFE' त्यापैकीच एक. १९३५ मधे 'हाजी हुसेन अली याक्षी' यांनी डेक्कनला नारायण शेठ यांच्या कडून ही जागा विकत घेऊन त्यावर 'गुडलक कॅफे' सुरु केला, आणि पाहता पाहता ही याने पुणेकरांच्या मनात जागा केली. आजमीतीला 'गुडलक कॅफे' हे पुण्यातले सगळ्यात जुने इराणी रेस्टॉरंट असल्याचा मान मिरवते आहे
 |
| PC : Mandar V. Bhalerao/facebook. |
इथल्या मेन्यु विषयी विचाराल तर तोंडाला पाणी सुटेल महाराजा
सकाळी ऑफिसची घाई आहे 'बनऑमलेट' खा,
दुपारी भूक लागली आहे 'बटर चिकन' आणि 'नान' तुमच स्वागत करतो.
संध्याकाळी थकुन भागुन ऑफिस मधून आल्यावर इथला 'चहा' आणि 'बनमस्का' म्हणजे तर स्वर्गच.
याच्या सोबतीने मित्रांचा गप्पांचा अड्डा जमला मग वेळ कसा आणि किती जातो याच भानच राहत नाही.
कधी जायच म्हणता... ?? अहो अगदी आठवड्याचे ७ ही दिवस सुरु असणारे हे रेस्टॉरंट सकाळी ७ ते रात्री ११.३० पर्यंत पुणेकर रसिकांच्या जिभेचे चोचले पुरवत असते. फक्त शनिवार आणि रविवार तुम्हाला इथे जागा मिळण्यासाठी अक्षरशः भांडावं लागत. FC रोडवरच्या सळसळत्या तरुणाईपासून ते अगदी प्रभात कॉलनी मधल्या अनुभवी आजोबांपर्यंत मस्का मारण्यासाठी सर्वांची आवडती जागा असलेल्या, अशा या 'गुडलक' ला एकदा तरी भेट द्यायलाचा हवी.