श्रीमंत


पानीपतच्या तडाख्यामधे मराठ्यांचे कित्येक जबरदस्त नुकसान झाले,पैसा गेला कर्ती माणसे गेली. निजामादी शत्रुंनी पुन्हा उचल घेतलेली होती, संपूर्ण राज्यवार एक अवकळा पसरली होती. अशा वेळेस एका 16 वर्षाच्या उमद्या तरुणाच्या खांद्यावर हे राज्य पुन्हा वसविण्याची जबाबदारी आली. हा तरुण म्हणजे बाळाजी बाजीराव उर्फ़ नानासाहेब व् गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा माधवराव बाळाजी भट अर्थात श्रीमंत माधवराव पेशवा.
२० जुलै १७६१ रोजी सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली, माधवरावांना पेशवाई मिळाल्याने रघुनाथराव आणि त्यांचे सहकारी नाराजच होते, त्यातच पानिपतच्या अनर्थामुळे चोहोंकडून शत्रु उठले होते, याशिवाय खुद्द पुण्यात सुरु असलेला गृहकलह यासारख्या शत्रूंनी सत्तेसाठी संघर्ष आरंभला होता. दोन्ही आघाड्यांवर लढत माधवरावांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसविली. मराठी राज्य गिळायला टपलेले हैदर, निजाम या शत्रूंचा बंदोबस्त करून मराठ्यांची दक्षिणेतील सत्ता भक्कम केली. अ‍हिल्यादेवी होळकरांना सन्मानाने वागविले आणि उत्तर हिंदुस्थानातील सरदारांवर वचक बसविला. राज्यात निःपक्षपाती न्यायपद्धती निर्माण करून प्रजाहिताच्या अनेक गोष्टी केल्या. कडक कारभारामुळे भ्रष्टाचार लाचलुचपतीला आळा बसला; प्रसंगी  राज्याच्या विरुद्ध वर्तन करणारे सरदार  'रास्तें' हे आपले मामा असुनही नात्याचा मुलाहिजान करता त्यांना  दंड करण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि  मातोश्री गोपिकाबाईंचा रोष ओढवून घेतला.
आपल्या उण्यापुर्या अकरा वर्षांच्या  दैदीप्यमान  कारकीर्दीत त्यांनी पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली.हैदरअली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा निर्माण केला...
आकस्मित बळावलेल्या क्षय रोगाने त्यांची शारीरिकक्षमता खंडित झाली आणि याच आजारात तो थेऊर येथे ऐन तारुण्याच्या उमेदीत हा वटवृक्ष कोसळला पावला.
माधवरावांच्या मृत्युबद्दल इतिहासकार ग्रांट डफ म्हणतो,                                                                            
" तरुण पेशव्याचा अकाली मृत्यु म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव ,
 त्यापुढे पानपताचा आघात काहीच नव्हे".
माधवरावांना जर अजुन आयुष्य लाभले असते तर पानीपताचा लागलेला डाग धुवून निघाला असता हे निश्चित. पेशवाईतील हा अखेरचा निष्कलंक चारित्रयाचा, कर्तबगार पेशवा होता. असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

अशा या श्रीमंत पेशव्याचा आज स्मृतिदिन.... त्यांना त्रिवार मुजरा !!!!!


लेखन सीमा
मंदार 


Labels: , , , , , , , , , , , ,