शेक्सपिअर ४०० वर्षाचा होताना

     आपल्या वडिलांच जॉन शेक्सपिअरच बोट धरून लहानपणी विविध कार्यक्रम पाहत पाहत त्या लहान मुलाने 'माणूसपणा, असा काही कोळून प्यायला कि गेली ४०० वर्षे तो अजूनही कोडं  बनून राहिला आहे. विल्यम जॉन शेक्सपिअर त्या मुलाच नाव.  गेली काही शतके कित्येकांना भुरळ घालणारा हा साहित्यिक, माणूस नावाचे रसायन असं पिला होता कि त्याच्या प्रत्येक नाटकामधून माणसाचे विकार हमखास दिसायचेच. त्याने स्वार्थाने जिवलग मित्रावर वार करणारा ब्रुटस टिपला, बायकोच्या चारित्र्याच्या संशयाने पछाडलेला ऑथेल्लो रंगमंचावर उतरवला, आईच्या व्याभिचाराने वेडापिसा झालेल्या हॅम्लेट चे रंग दाखवले. राग, लोभ, मत्सर, वासना, राक्षसी महत्वाकांक्षा असे माणसाच्या मनात बसलेले शत्रू त्याने जाहीररीत्या रंगभूमीवर अवतरवले आणि अफाट लोक प्रियता मिळविली. पण एवढे सगळ करून शेक्सपिअर थोडा तरी उरतोच. कारण माणसाच्या मनाचा थांग आजपर्यंत कोणाला लागलाय का ??? शेक्सपिअर वर आज वर अगणित लोकांनी पीएचडी केल्या संशोधन केलं ( PHD करणारे सगळेच हुशार नसतात म्हणा ) त्यात हा शेक्सपिअर मग याला समजून घेण म्हणजे महाकठीणच, कारण प्रत्येकाला शेक्सपिअर वेगवेगळा समजतो.
     अवघ्या ५२ वर्षाच्या आयुष्यात मध्ये  तब्बल ३८ नाटकं, १५४ सुनीतं, सहा दीर्घ काव्यं अशी साहित्य  संपदा लिहिणारा हा माणूस अजूनही तेवढच आकाश व्यापून राहिलाय जेवढा ३५० वर्षापूर्वी होता. बऱ याची नाटकांची नावं म्हणाल तर अगदी एका शब्दांची. पण जसजशी नाटकाची संहिता उलगडत जाते, आपण त्यामध्ये शिरतो आणि कधी ज्युलियस सिझर तर कधी ऑथेल्लो  बनून त्यातलेच एक कधी होऊन जातो ते कळतही नाही . त्याने माणसाचे विकार रंगभूमीवर नेले आणि त्यातल्या व्यक्तिरेखांना माणसात आणले, हेच त्याच्या लिखाणाचे बहुधा यश असावे. त्याची स्वगत, त्याने वापरलेले शब्द आजच्या जीवनात एवढे सहजपणे पणे वापरले जातात. तो जेवढा पुस्तकात दिसतो त्याच्यापेक्षा जास्त रंगभूमीवर, चित्रपटात भव्य वाटतो. म्हणूनच कि काय जगभरात त्याच्या नाटकांवर चित्रपट बनत असतात, अगदी भारतात सुद्धा विशाल भारद्वाजने 'मकबूल' , 'ओंकारा' सारखे त्याच्या नाटकांवर आधारीत चित्रपट बनवले आहेत आणि यशवी सुद्धा झालेत कारण एकच माणसाच्या भावनांच प्रतिबिंब त्यात दिसलं. 
     अधून मधून शेक्सपिअर किती होते याच्या चर्चा चालतात, कोणी म्हणत तो लेखकांचा समूह होता, तर कोणी म्हणत तो एक राजा होता. पण खरंच शेक्सपिअर एक नसावाच, कारण तो प्रत्येक माणसात वसलेला आहे. राग, लोभ, मत्सर, प्रेम, वासना यांच्या रुपात. जगात जितकी माणस आहेत तितके शेक्सपिअर आहेत असं  म्हणता येईल. आणी शेक्सपिअर शोधायचा तो कुठे ??? एकदा आरश्यासमोर उभ रहा तो तुम्हाला सापडेल, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या राग, लोभ, मत्सर या भावना प्रकट कराल तेव्हा तेव्हा तो, अगदी अगणित काळासाठी आपल्या सोबत असेल. 



--- जिप्सी 




Labels: , , , , , , , , , , , , , , , , ,