तो येतोय ....

तो येतोय....

सगळीकडे त्याचीच चर्चा आहे
विहिरीच्या उरलेलं पाणी खरडून त्यात धुणीभांडी करणारीं दूरवर उडणारी वावटळ पाहून, 'ती' पण म्हणते तो येतोय..
'त्याने' अख्ख शेत नांगरून ठेवलंय, ढेकळं मोकळी करून ठेवली पाणी पिण्यासाठी. जमिनीने मूळ घट्ट धरून ठेवलेल्या आंब्याच्या सावलीत 'सर्जा-राजा' ला वैरण देऊन त्यांच्या शेजारी भाकर-तुकडा खाऊन तो थोडा पाठ टेकवतो, मग त्याला ती थंडगार झुळूक जाणवते मागोमाग क्षितिजावरती एक चुकार काळसर ढग पण दिसतो आणि याचं काळीज पुन्हा खुलतं तो पुन्हा सावरून उठतो.
गावात दुपारच्या रणरणत्या उन्हात पारावर 2-4 वठलेली जुनी खोडं नाकात तापकीर कोंबत 'भेंडवळी' वर गप्पा झाडत असताना एक म्हातारा जरा नजर दूरवर करतो त्याला दिसतो तो 'कृष्णमेघ'. तो आकाशा कडे हात जोडतो आणि म्हणतो "बगा त्यो आला किसन देवाचा ढग, यंदा तरी चांगला बरसजो बाप्पा". आणि पारावरच्या त्या सुरकुत्या आनंदाने थरारून उठतात.
इकडे शहरात पण बालगंधर्वच्या ब्रिजवरून थंडगार वाऱ्याच्या झुळुकी सुरु झालेल्या असतात, दूरवर दिसणाऱ्या 'सिंहगडा' मागून एखादा ढग लपून-छपून पुण्यात येतांना दिसतो.  तो दिसला कि लगेच AC-PC च्या जगात जगणार्या लोकांचे यंदा कुठे जायचं याचे प्लान बनवायला सुरवात होतात, एव्हाना ऑफिसच्या कॅफेटेरियात 'BLACK COFFEE' सोबत गप्पांचे फड रंगायला लागतात, लगेच व्हॉटसऍप ग्रुप तयार होतात. कोणी 'आंबोली' प्लान करतं तर कोणी विकेन्डला लौकरच धुक्यात गडप होणार्या 'कळसूबाई' च दर्शन घ्यायचं ठरवते.

या चराचरातला प्रत्येक जण 'मन पाऊस पाऊस' करत चातका सारखं त्याच्या येण्याची वाट पाहतोय.

तो येतोय सृष्टीचा कॅनव्हास हिरव्या रंगांनी रंगवायला ....
पुन्हा आयुष्य सुंदर बनवायला....
पुन्हा जगणं शिकवायला !!!

#जिप्सी
#पाऊसवेड

Labels: , , , , , , , , , ,