टायगर हिल

१९९९ साली पाकिस्तान विरुद्ध लढलं गेलेलं 'कारगिल युद्ध' हे  'ऑपरेशन विजय' म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ६० दिवस चाललेल्या या युद्धात अनेक घनघोर संग्राम झाले, अनेक ज्ञात-अज्ञात वीरांची आहुती या युद्धात पडली. यातल्या काही चकमकी जगातल्या उंचावर लढल्या गेल्यामुळे  इतिहासात अजरामर झाल्या. 'टायगर हिल' वर विजय मिळवताना झालेली लढाई हि अश्यांपैकीच एक होती. ज्यात भारतीय सैन्याने असीम शौर्य दाखवून विजय मिळविला त्याचीच हि गोष्ट.
______________________________________________

३ जुलै १९९९ च्या संध्याकाळी सूर्य मावळत असताना तयारी सुरु होती कारगिल युद्धातल्या सगळ्यात भीषण रणसंग्रामाची. त्यात समोर होती १६,५०० फुटांची बर्फ़ाने आच्छादलेली भिंत आणि त्यावर बंकर मध्ये मातृभूमीचा घास घेण्यासाठी टपून बसलेला शत्रू . जून महिन्यात 'तोलोलिंग' वरून पाकिस्तानी सैन्याला हटवल्यानंतर 'टायगर हिल' वर विजय मिळवण्यासाठी रणनीती आखणे सुरु केले. पण त्यावर विजय मिळवणे एवढे सोपे नव्हते कारण, एक तर हे ठाणे उंचावर होते, पाकिस्तानी सैन्याने आधीच त्यावर ताबा मिळवून ३ बंकर्स च्या साह्याने ते ठाणे अतिशय मजबूत केले होते आणि बाकीच्या मार्गांवर सातत्याने हल्ला सुरु असल्याने नेहमीच्या मार्गाने चढाई करणे हा मार्ग बंद झाला. आता फक्त एकच मार्ग उरला होता तो म्हणजे ती उंच बर्फाच्छादित कातळभिंत चढून जायचं आणि हल्ला करायचा.
'घातक प्लाटून' ला हे शिखर सर करण्यास सांगितले, त्यांच्या मदतीला ८व्या शीख रेजिमेंट आणि २ नागा यांनी खालून  'रॉकेट लॉन्चर' चा मारा करून 'प्लाटून' ला कव्हर द्यावे अशी रणनीती ठरली.त्याप्रमाणे ३ तारखेला अंधार पडल्यानंतर १९;०० वाजता  'सुबेदार योगेंद्र सिंग यादव'  आणि त्यांच्या १८ ग्रेनेडीयर्सच्या जवानांनी दोर लावून भिंत सर करायला सुरवात केली. अर्ध्यात पोहचले असताना मध्यरात्री शत्रूला अचानक या हालचालींचा सुगावा लागल्याने हि चढाई रोखण्यासाठी शत्रूने ऑटोमॅटिक मशीनच्या साह्याने सुबेदार आणि त्यांच्या साथीदारांवर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये 'घातक प्लाटून चा कमांडर आणी दोन साथीदार शहीद झाले. सुबेदारांच्या खांद्याला गोळी लागून ते सुद्धा जख्मी झाले होते पण, त्याही परिस्थितीत हार न मानता सुबेदार पहाटे ४ वाजता शिखरावर पहिल्या बंकर समोर पोचले. तेव्हा त्यांना पाहून शत्रू आवाक झाला कारण भारतीय सैन्य या बाजूने येईल याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. पण लौकरच भानावर येऊन पुन्हा हल्ला सुरु केला. सुबेदारांनी पहिल्या बंकर मध्ये अचूक ग्रेनेड फेकला त्यामुळे तिथले सैन्य गारद झाला. पण एव्हढ्यानेच त्यांच काम होणार नव्हतं, शत्रू अजूनही दुसर्या बंकर मधून त्यांच्या साथीदारांवर हल्ला करतच होता. त्यामुळे  दुसर्या बंकर कडे मोर्चा वळवून आपल्या शौर्याचे  प्रदर्शन करत त्यांनी  शत्रूवर हल्ला चढवला आणि साथीदारांवर गोळ्या चालवणाऱ्या बंदुका समोरासमोरच्या लढाईत कायमच्या शांत केल्या . यानंतर त्यांच्या साथीदारांनी तिसर्या बंकर वर जोरदार हल्ला चढवून उरल्या सुरल्या शत्रूला नामशेष केले आणि सकाळी ६.५० ला पुन्हा एकदा 'टायगर हिल' (पॉईंट ४६६०) वर अभिनामाने तिरंगा रोवला गेला . टायगर हिलवारच्या या विजयाची जगभरात प्रशंसा केली गेली आणि पाकिस्तान चा खोटे पणा पुन्हा एकदा उघड झाला होता.

त्यांच्या शरीरावर शत्रूच्या १५ गोळ्यांनी विविध ठिकाणी जखमा केल्या होत्या, या गंभीर परिस्थितीत त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं. पुढे त्यांच्या या असामान्य कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना 'परमवीर चक्र' हा सन्मान देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्या मेडल वर हा संदेश पुढील संदेश आहे.

“Grenadier Yogender Singh Yadav displayed the most conspicuous courage, indomitable gallantry, grit and determination under extreme adverse circumstances.”


GRENADIER YOGINDER SINGH YADAV
 18 GRENADIERS (2690-572)

जय हिंद जय भारत 

मंदार

Photo courtecy : Indian Army website
 





Labels: , , , , , , , , , , , , , , ,