मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई

मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५

______________________________________________________

जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले. 

दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही.  असेच दोन दिवस गेले.  आता मरणाची भीती  कमी झाली आणि तहान-भूक जाणवायला सुरवात झाली. 

अजून चार दिवस असेच गेले. आता नवरा-बायकोला जगणं काय नि मरण काय यात काहीही स्वारस्य राहिलं नाही. दोघेही लपलेल्या जागेतून बाहेर आले. नवऱ्याने मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केली, लोक तिकडे आकर्षित झाले, तो म्हणाला
" आम्ही दोघंही स्वतःला तुमच्या हवाली करत आहोत, आम्हाला मारून टाका."

जे आवाजाने आकर्षित झाले होते, ते विचारात पडले, "आपल्या धर्मात तर जीव हत्या पाप आहे."

ते सगळे जैनी होते, पण त्यांनी आपापसात चर्चा केली आणि नवरा-बायकोला योग्य कारवाई साठी दुसऱ्या गल्लीतल्या माणसांच्या हवाली केलं. 

Labels: , , , , , , , , , , ,