नेहमीप्रमाणे तुमचं रोजचं आयुष्य सुरु आहे.
रोज उठता... ऑफिसला जाता... ऑफिस वरून येता...बॉस वर चरफडता...
हिंजवडी-सिंहगड रोडवरच्या गर्दीला वैतागता...
हे सगळं सुरु असतांना तुम्हाला कळतं कि तुम्ही कॅन्सरचे पेशन्ट आहे आणि तो अगदी शेवटच्या पायरीवर असून तुमच्या हातात फक्त २-३ महीनेच उरले आहेत.
धक्का बसेल ना तुम्हाला ???
कायम अबोल असलेल्या 'अमर कौल ' ला सुद्धा असाच धक्का बसतो.
रोजच्या रोज कामाची यादी करण्याची सवय असलेला थोडा अबोल, हळवा असलेला अमर मग त्याच्या आयुष्यात राहिलेल्या शेवटच्या १० इच्छा लिहून काढतो आणि त्या पूर्ण करतो, याचा प्रवास म्हणजे 'दसविदानिया'!
खरंतर याआधी खूप वेळा पाहिलाय हा चित्रपट! पण प्रत्येक वेळेस अंतर्मुख करून सोडतो, नव्याने कळतो, तुमच्यातल्या 'स्व' ला ढवळून काढतो.
या चित्रपटाची स्टारकास्ट जास्त नावाजलेली नाही, पण अभिनयाच्या बाबतीत सगळे अगदी बाप आहेत. विनय पाठक, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि कधी नव्हे ते नेहा धुपियाने केलेली छोटी पण सुंदर भूमिका! या सगळ्यांची उत्तम सरमिसळ दसविदानियात जमून आलेली आहे. आता सुभाष कपूरच्या 'जॉली एलएलबी' अधून माहीत झालेला जज्ज 'सुंदरलाल त्रिपाठी' अर्थात 'सौरभ शुक्ला'! थोडा जाड, टकला, खादाड, खत्रूड असा बॉस त्याने परफेक्टली रंगवलाय. ( मी बॉस च्या बाबतीत नशीबवान आहे तसा). हा चित्रपट जरी विनय पाठकचा असला तरी अगदी छोट्या प्रसंगात सुद्धा सौरभ त्याचा खडूसपणे 'क्या' ? असा प्रश्न विचारणारा 'दासगुप्ता' भाव खाऊन जातो.
विनय पाठक बद्दल काय बोलावं? रंगभूमीवरचा कसलेला कलाकार असलेला हा माणूस या चित्रपटात आपल्या डोळ्यात अश्रू आणतो. कायम अबोल, हळवा असलेला 'अमर कौल ' त्याने निरागसपणे रंगवलाय. गाडी विकत घेतल्यानंतर त्या सेल्सवाल्या मुलीला नम्रपणे ड्राईव्ह ऑफर करणारा... नेहा भानोत वरचे प्रेम व्यक्त करायला घाबरणारा; पण तिने एक क्षण तरी आपल्यावर प्रेम करावं, अशी भाबडी इच्छा असलेला अमर! आपल्याला कॅन्सर आहे, हे जर आईला सांगितलं तर ते ती सहन करू शकणार नाही, याची जाणीव असणारा... लहानपणीच्या नॉस्टेल्जीयात रमणारा मध्यमवर्गीय 'मिस्टर अमर कौल' त्याने खूप सुंदर रंगवलाय.
'दसविदानिया' हि गोष्ट आहे तुमची-माझी ... आयुष्यात काही ना काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या प्रत्येकाची! यातला डार्क ह्यूमर तुमच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू एकाच वेळी आणतो. चित्रपटाची सुरवात होते ती 'पल भर के लिए कोई हमे प्यार कर ले, झुटा ही सही’ या गाण्याने.
आपण सुद्धा आयुष्यभर अश्याच एखाद्या व्यक्तीच्या शोधात असतो नाही का ??