Sachin... Sachin...

'सचिन रमेश तेंडुलकर' या नावात साऱ्या भारताचं क्रिकेट जग सामावून घेतलं आहे असं म्हंटल्यास ती अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही. २४ एप्रिल 1973 मध्ये जन्मलेल्या या देवाने आम्हा 90च्या पिढीसाठी अमुल्य आठवणी ठेवल्या आहेत. सचिन काय चीज आहे हे दिसायची सुरवात झाली ती रणजी ट्रॉफी पासून. आता जरी बहुतांश क्रिकेटपटू व्यस्त वेळापत्रकामुळे रणजी खेळत नसले , तरी 90s मध्ये सारे जीव लावून खेळायचे. अशीच एक मॅच होती मुंबई विरुद्ध हरियाणा. रणजी ट्रॉफी जिंकायला शेवटच्या पाचव्या दिवशी 355 रन्स पाहिजे होते, नेहमी प्रमाणे ओपनर बॅट्समन माती खाल्ल्यावर लंच नंतर तू खेळायला आला त्यावेळी तुझं वय होतं १८ वर्ष आणि नॉन स्ट्रायकर एन्ड ला होता दिलीप वेंगसरकर. हरयाणाचा कॅप्टन होता कपिल पाजी. तू आल्या आल्या त्याला खणखणीत सिक्स मारली आणि हा हा म्हणता वानखेडे स्टेडियम भरून गेलं. कपिलने सारे बॉलर्स वापरून पाहिले पण तूला आवरणं त्यावेळी कुणालाही शक्य होत नव्हतं. भांडरीच्या बॉलिंगवर आऊट झाल्यावर वेंगसरकरने प्रयत्न करूनही ती फायनल जिंकता आली नव्हती. पण तू काय आहे हे साऱ्या देशाला माहिती झालं. 
तश्या तुझ्या  अगणित इनिंग्स अविस्मरणीय झाल्या आहेत, पण १९९८ मधली शारजात तू ऑस्ट्रेलियाची धुलाई केलेली 'डेझर्ट स्टॉर्म' मॅच खुद्द वॉर्न विसरू शकला नाही तर आम्ही कसं विसरणार देवा.
२०००च्या सुरवातीला तू  जॉन राईटच्या कोचिंग आणि दादा गांगुलीच्या कॅप्टनसी मध्ये सेहवाग, द्रविड, लक्ष्मण गांगुली यांच्यासोबत बिग 5 चा  भाग झाला . त्यानंतर तुला झालेली 'टेनिस एल्बो' ची दुखापत तुझ्यासहित आम्हालाही  हादरवून गेली होती, फास्ट बॉलरला समोर येऊन सिक्स ठोकणारा तू आता हळूहळू खेळायला लागला होतास . हुक्स, पूल,कट्स जणू कहा गुंडाळून ठेवले  होतेस. त्या काळाबद्दल हर्षा भोगले म्हणतो " He could do it fine, that wasn't him" .  २००३च्या वर्ल्डकप मध्ये 'रावळपिंडी एक्स्प्रेस' च्या चिंध्या उडवणारा अप्पर कटला मारलेला सिक्सर, ग्लेन मॅकग्राला समोर येऊन मारलेला सिक्स असो, २००८ च्या कॉमनवेल्थ सिरीजच्या पहिल्या फायनल मध्ये मध्ये 'ब्रेट ली' ला मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह असो तुझे फटके कोण विसरू शकेल देवा. 
२००६ संपताना सचिन संपला ची चर्चा सुरू झाली होती, त्या हरामखोर 'चॅपेल' ने तर तुला चक्क निवृत्त व्हायचा सल्ला दिला होता.  पण तू कायमच शांत होतास, सहयाद्री सारखा अचल होता.  कारण तुला माहीत होतं तुझा आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटचा सर्वोत्तम काळ पुढे येणार होता. तू नर्व्हस 90s मध्ये झगडत असतांनाही तुझ्या चेहऱ्यावरची सकारात्मकता आम्हाला वेगळंच बळ द्यायची. तुझ्यात जेवढा शांत पणा आहे तो आज क्वचितच कोणामध्ये दिसतो, तेव्हाही तुझ्या खेळण्यावर टिका करायचे  आजही न्युजचॅनेल मधून तुझ्या खासदारकीवर टिका होत असते  पण तू कायमच तुझ्या कामातून आणि खेळण्यातून टीकाकारांचे तोंड बंद केलेस. तसा राजकारण तुझा प्रांत नाहीच पण, इथेही तू कित्येक जणांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर वाहतोयस क्रिकेट मध्ये वाहायचा तसाच. 
आज कित्येक आई-वडिलांनी तुझ्या नावावर त्यांच्या पोराचं नाव सचिन ठेवलंय, फक्त तुझ्याकडे पाहून कित्येक मुलं वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क असो की दुरवच्या अकोल्यातील क्रिकेट क्लबच ग्राउंडवर सराव करतात, का तर आपण पण 'सचिन' सारखं खेळावं म्हणून. त्यांना माहिती आहे सचिन शतकातून एकदाच होतो, पण तरीही चिवटपणे लढण्याची जिगर फक्त तुझ्यामुळे त्यांना मिळते. अजून ३०-४०वर्षांनी मी जेव्हा म्हातारा होईन, तेव्हा माझ्या पुढच्या पिढीला Matthew Hayden म्हणाला तसं  अभिमानाने सांगू शकेल
 " I have seen God. He bats for India at number 4 in tests" ...

देवा आज तुझा वाढदिवस आहे. आमचं सारं जग व्यापून टाकणाऱ्या, कोट्यवधी क्रीडाप्रेमींच्या मनात घर असणाऱ्या तुला उदंड आयुष्य जग याशिवाय आम्ही भक्त तुला काय शुभेच्छा देणार रे !!!

जुग जुग जियो देवा 


Labels: , , , , , , , , , , , , , , ,