मंटोच्या लघुकथा 5 : करामात

करामात
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
________________________________________________________________________

दंगलीत लुटलेला माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी आता घरोघरी छापे मारायला सुरवात केली होती.
मग कायद्यांच्या कचाट्यापासून वाचण्यासाठी लोकांनी घाबरून रात्रीच लुटलेला माल रस्त्यांवर फेकून द्यायला सुरवात केली.
पण, एका माणसाची जरा वेगळीच गोष्टच होती, त्याच्याकडे दोन पोती साखर होती जी त्याने दंगलीचा फायदा घेऊन एका बनियाच्या दुकानातून लुटली होती. रात्रीच्या अंधारात त्याने  कसबसं एक पोतं जवळच्या विहिरीत फेकलं, पण जेव्हा दुसरं पोतं फेकायला गेला तेव्हा त्या पोत्यासहित तो हि विहिरीत गेला.
त्याचा वाचण्यासाठीचा आरडाओरडा ऐकून लोक जमा झाले, विहिरीत दोर सोडले गेले. तरुणांनी त्याला बाहेर काढलं.

पण दुर्दैवाने तो जास्त काळ जगू शकला नाही.  पुढे काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशी लोकांनी जेव्हा त्या विहिरीतलं पाणी वापरयाला काढलं तेव्हा त्यांना चवीला गोड लागलं
त्या रात्री त्याच्या कबरीवर दिवे जळत होते.


अनुवाद : मंदार भालेराव
__________


आज  मंटोचा वाढदिवस ११ मे १९१२ रोजी खानदानी वकिलांच्या घरात जन्मलेल्या मंटोला दुर्दैवाने फक्त ४३ वर्षांचं आयुष्य लाभलं. पण या छोट्या आयुष्यात हि त्याने इतकं सकस लिखाण केलंय कि आजही ते वाचतांना वाचक मनातून हलतो. ४२ वर्ष ०८ महिने आणि ०७ दिवसांच्या आयुष्यात  लिहण्यासाठी मिळाली ती फक्त १९ वर्षे आणि या वर्षात त्याने समाजाचा आरसा होणारे अनेक स्फोटक लेख, कथा लिहिल्या. त्यापैकी 'काली शलवार ', धुआ, बु , ठंडा गोश्त आणि उपर नीचे और दरमियाँ यांसाठी त्याला खटल्याना सामोरं जावं लागलं. अश्या या  वादळी लेखकाचा आज वाढदिवस, निमित्त शतशः अभिवादन.



Labels: , , ,