HMS Eulysses

'युद्धस्य कथाः रम्या' संस्कृत मध्ये असं काहीसं सुभाषित आहे, खरंच आहे म्हणा ते ! आजही युद्धाच्या कथा ऐकून अंगावर शहारे न येणारा माणूस निराळाच म्हणावा लागेल. साऱ्या युद्ध वाङ्मयात सुद्धा दुसऱ्या महायुद्धावरच्या कथांबद्दल जास्त उत्सुकता असते.
दुसऱ्या महायुद्धातल्या एका अश्याच अचाट कामीगिरीची कथा आहे 'एच.एम.एस. युलिसिस'. दुसऱ्या महायुद्धात पूर्वेकडील युद्धक्षेत्रात रणगाडे, शस्त्रास्त्र इत्यादी रसद घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजांना संरक्षण देण्याचे काम करणाऱ्या जहाजांच्या ताफ्याचं नेतृत्व युलिसिस करत होती.  कित्येक महिने अविश्रांत काम केल्याने युलिसिस वरचा कर्मचारी वर्ग थकून जातो आणि काही आज्ञा पाळायला नकार देतो. युद्ध काळात आज्ञा न पाळणे म्हणजे जणू बंडच. याच बंडाची शिक्षा म्हणून युलिसिस ला पुन्हा आर्क्टिक प्रदेशात त्याच कामीगिरीवर धाडण्यात येते. या कामगिरीवर असतांना शत्रूंने केलेल्या हल्ल्याला युलिसिस कशी तोंड देते, तिची कामगिरी यशस्वी होते कि नाही हे सारे म्हणजे 'एच एम एस युलिसिस'.
या कादंबरीची सर्वात सुंदर बाब म्हणजे हिची लेखन शैली. लेखक Alistair Maclean स्वतः अश्या प्रकारच्या जहाजावर टोर्पिडो ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. त्यामुळे त्याच्या लेखनात जहाजावरचे अंतरंग अत्यंत खुबीने येतात. जहाजावरच्या काम करण्याच्या पद्धती, दुरवरच्या प्रवासामुळे लोकांवर होणारे परिणाम, वागण्यात होणारे बदल हे सारे त्याच्या लेखनात अत्यंत बारिकाईने मांडले आहे, त्यामुळे कादंबरीचा शेवट होता होता आपण सुद्धा त्या जहाजावरचा एखादा सैनिक आहो कि काय असे वाटायला लागते.

मराठीत याच कादंबरीचा 'बाळ भागवत'  यांनी 'सागर कथा' म्हणून अनुवाद केला आहे.

तर तुम्हांला जर युध्दकथांत रस असेल, तर हि कादंबरी नक्किच चुकवू नका.

एच. एम. एस. युलिसिस
कथा प्रकार : युद्ध कादंबरी
लेखक : Alistair Maclean

#पुस्तक_बिस्तक

Labels: , , , ,